विमान प्रवास 25 टक्क्यांपर्यंत महागणार; एअरलाइन्स कंपन्यांचा खर्च वाढला, रिफायनरी उत्पादनात घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल-डिझेल आणि सिलिंडरमध्ये झालेल्या भरभक्कम दरवाढीमुळे आधीच सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त झाला असताना आता विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासुद्धा जास्तीचे पैसे मोजावे लागतील. लवकरच विमान प्रवास तब्बल 25 टक्क्यांनी महागणार आहे, असा दावा ग्लोबल कन्सल्टिंग फर्म मॅकिन्झीने आपल्या अहवालात केला आहे.

सध्या जगभरात सुरू असलेला तणाव आणि रिफायनरी उत्पादनातील घट यामुळे जेट इंधनाच्या पुरवठय़ावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे एअरलाइन्स कंपन्यांचा खर्च वाढला आहे, असे या अहवालात म्हटले आहे. कंपन्यांवर वाढलेल्या याच आर्थिक बोजाचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर होऊ शकतो.

जेट इंधनाच्या किमतीतील वाढीचे मुख्य कारण कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार आहे. आखाती प्रदेश आणि प्रमुख आशियाई देशांमधून होणाऱ्या इंधन निर्यातीत घट झाली आहे. इराण-अमेरिका, इस्रायल यांच्यातील तणावानंतर हिंदुस्थान, चीन आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी आपापल्या इंधन निर्यातीवर अंशतः बंदी घातली आहे.