दिल्लीतून लढलात, तर 10 लाख मते मिळतील! मेलोनींनी सांगितला दिल्लीतील ‘तो’ रंजक किस्सा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुम्ही नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या राहिलात, तर तुम्हाला सहज 10 लाख मते मिळतील… इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल हे उद्गार कोणा हिंदुस्थानी नेत्याने नाही, तर इटलीचे उपपंतप्रधान अँटोनियो तायानी यांनी काढले होते. जॉर्जिया मेलोनी या 2023 मध्ये हिंदुस्थान दौऱ्यावर आलेल्या होत्या. यावेळी दिल्लीमध्ये त्यांच्यासोबत घडलेला रंजक किस्सा त्यांनी जॉर्जियाज व्हिजन’ या पुस्तकामध्ये नमूद केला आहे. ज्येष्ठ पत्रकार अलेस्सँड्रो सल्लुस्ती यांच्याशी झालेल्या संभाषणावर आधारित असलेल्या या पुस्तकात मेलोनी यांनी जागतिक नेत्यांसोबतचे राजनैतिक संबंध आणि पडद्यामागचे काही किस्से जाहीर केले आहेत.

मी जेव्हा दिल्लीत पोहोचले, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा दर काही अंतरावर माझा हसरा चेहरा असलेले आणि वेलकम लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले होते. तर मी जेव्हा दिल्ली सोडत होते, तेव्हा त्याच फोटोंवर थँक यू फॉर व्हिजिटिंग असे लिहिले होते. हे पाहून माझ्यासोबत असलेले उपपंतप्रधान अँटोनियो तायानी यांनी मिश्कीलपणे टिप्पणी केली की, इतके पोस्टर्स पाहता, जर तुम्ही दिल्लीतून निवडणूक लढवली तर तुम्हाला 10 लाख मते नक्कीच मिळतील! असे जॉर्जिया मेलोनी यांनी पुस्तकात म्हटले आहे. विशेष म्हणजे 2023 मध्ये मेलोनी यांनी मार्च आणि सप्टेंबर असे हिंदुस्थानचे दोन दौरे केले होते.  ‘डेक्कन हेराल्ड‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पुस्तकातील हेड हेल्ड हाय अमंग द वर्ल्ड ग्रेट्स या प्रकरणात मेलोनी यांनी जागतिक मुत्सद्देगिरीचा उल्लेख केला आहे. यशस्वी राजनैतिक संबंधांसाठी केवळ औपचारिकतेच्या चौकटीत राहून चालत नाही, तर समोरच्या व्यक्तीशी जोडले जाण्यासाठी एक वैयक्तिक दुवा शोधावा लागतो. कधीकधी समुद्राकिनारी घेतलेला सिगारेटचा झुरका किंवा ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ सारख्या काल्पनिक कादंबरीवरील चर्चा देखील दोन देशांमधील संबंध दृढ करू शकते, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, या पुस्तकाला अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तसेच या पुस्तकामध्ये जागतिक नेत्यांसोबतची मैत्री आणि त्यांच्याकडून मिळालेल्या खास भेटींचाही उल्लेख आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील पडद्यामागच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.