
दीर्घकाळाच्या उकाड्यानंतर पावसाच्या सरी कोसळू लागल्या की वातावरणात सुखद गारवा निर्माण होतो. पण हाच ऋतू आपल्यासोबत अनेक आजार आणि संसर्ग घेऊन येतो. पावसाळ्यात हवेतील दमटपणा आणि आर्द्रता वाढल्यामुळे जिवाणू आणि बुरशीची वाढ वेगाने होते. अशा वेळी आपल्या पचनसंस्थेची कार्यक्षमता देखील मंदावते. म्हणूनच, पावसाळ्यात जिभेचे चोचले पुरवणे आरोग्यासाठी भारी पडू शकते. त्यामुळे पावसाळ्यात निरोगी राहायचे असेल तर, खालील पदार्थांचे सेवन करणे त्वरित थांबवा, अन्यथा तुम्हाला गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
1. रस्त्यावरील उघडे आणि तळलेले पदार्थ
पावसाळा सुरू झाला की अनेकांना भजी, वडापाव, आणि चाट खाण्याची तीव्र इच्छा होते. मात्र, रस्त्यावरील उघड्या पदार्थांवर दूषित पाणी आणि माशांमुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तसेच पावसाळ्यात पचनक्रिया मंदावलेली असल्याने जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ पचायला जड जातात. यामुळे अपचन, गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास वाढतो.
2.पालेभाज्या खाताना घ्या विशेष काळजी
पावसाळ्यात मेथी, पालक, कोबी यांसारख्या पालेभाज्या खाणे टाळलेलेच बरे. या ऋतूत पालेभाज्यांच्या पानांवर बारीक किडे, अळ्या आणि त्यांचे अंडे असण्याची शक्यता असते. तसेच या भाज्या चिखलात आणि दूषित पाण्यात वाढण्याची भीती असते. पालेभाज्या खायच्याच असतील तर, त्या कोमट पाण्यात मीठ टाकून व्यवस्थित धुवून आणि चांगल्या शिजवूनच खाव्यात.
3.. सी-फूड (मासे आणि खेकडे) खाणे टाळा
पावसाळा हा माशांचा प्रजननाचा (Breeding Season) काळ असतो. या काळात समुद्राचे पाणीही दूषित झालेले असते. त्यामुळे मासे आणि इतर सी-फूड खाल्ल्याने पोटात संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त असतो. बाजारात मिळणारे मासे ताजे नसण्याची शक्यताही असते. यामुळे पोटाचे गंभीर आजार उद्भवू शकतात.
4. कच्चे सॅलड आणि कापलेली फळे
आरोग्यासाठी सॅलड उत्तम मानले जात असले, तरी पावसाळ्यात ‘कच्चे सॅलड’ खाणे टाळावे. हॉटेल किंवा रस्त्याच्या कडेला आधीच कापून ठेवलेली फळे आणि भाज्यांवर बॅक्टेरिया वेगाने पसरतात. यामुळे डायरिया, टायफॉइड आणि गॅस्ट्रोसारखे आजार होऊ शकतात. फळे नेहमी ताजी कापून लगेच खावीत.
5. कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि थंड पेये
पावसाळ्यात शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी कोमट किंवा गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते. या ऋतूत कोल्ड ड्रिंक्स, पॅकबंद ज्यूस किंवा बर्फाचे गोळे खाणे टाळावे. या पेयांमध्ये वापरले जाणारे पाणी दूषित असू शकते. यामुळे घसा खवखवणे, सर्दी-खोकला आणि पोटाचे इन्फेक्शन होऊ शकते.
पावसाळ्यात काय खावे?
1. नेहमी उकळून कोमट केलेले पाणी प्यावे.
2. आहारात सूप, आल्याचा चहा, कढीपत्ता आणि पुदिन्याचा वापर वाढवावा.
3. पचनास हलके आणि गरम अन्नपदार्थांचे सेवन करावे.
पावसाळ्यात कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?
पावसाच्या दिवसांमध्ये जर पोटदुखी, उलट्या, जुलाब, पोट फुगणे, ताप, अशक्तपणा किंवा भूक न लागणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी.




























































