
शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच महावितरणने स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घातला आहे. मात्र खोपोली शहराला अखंड वीजपुरवठा द्या त्यानंतर स्मार्ट मीटरबाबत निर्णय घ्या, अशी मागणीसाठी खोपोली-खालापूर तालुका संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणावर धडक दिली. उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
पावसाळ्यात तसेच इतर काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे सामान्य नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण तसेच उद्योग क्षेत्राला त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन संघर्ष समितीने महावितरणवर धडक दिली. महावितरणकडे शहरामध्ये भूमिगत वीज केबल टाकण्यासह वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत राहण्यासाठी ठोस नियोजन करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत खोपोलीकरांना अखंड व दर्जेदार वीजपुरवठ्याची खात्री मिळत नाही तोपर्यंत शहरात स्मार्ट मीटरची सक्ती करण्यास नागरिकांचा विरोध कायम राहील, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.



























































