
अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये मृत झालेले हिंदुस्थानी खलाशी राकेश चौहान यांचा मृतदेह अखेर हिंदुस्थानात आणण्यात आला, परंतु त्यांच्या मृतदेहातून हृदय, मेंदूसह महत्त्वाचे अवयव गायब असल्याने राकेश यांच्या कुटुंबांना प्रचंड धक्का बसला आहे. शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक सत्य उघड झाले आहे.
राकेश चौहान हे नोव्हेंबर 2025 मध्ये ‘एक्सफिनिटी’ नावाच्या कंपनी मार्फत मर्चंट नेव्हीच्या जहाजावर कामासाठी व्हेनेझुएलाला गेले होते. राकेश चौहान यांचा मृतदेह व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यूची सविस्तर माहिती न देता थेट उत्तर प्रदेशातील देवरिया या त्यांच्या मूळ गावी पाठवला. कंपनीने दिलेल्या संशयास्पद माहितीमुळे कुटुंबीयांनी हिंदुस्थानात पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हिंदुस्थानात करण्यात आलेल्या पोस्टमार्टम अहवालातून अंगावर काटा आणणारे सत्य समोर आले आहे. राकेश यांच्या शरीरात एकही अंतर्गत अवयव शिल्लक नव्हता. मेंदू आणि हृदय, दोन्ही फुप्फुसे, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड, प्लीहा, स्वादुपिंड आणि जठर, आतडे, थायरॉईड आणि श्वसननलिका, तसेच राकेश यांच्या मृतदेहावर मानेपासून पोटापर्यंत 22 टाके आणि एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत 21 टाके घालण्यात आले होते. मृतदेह जवळपास महिनाभर डीप फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. शरीरात एकही अवयव शिल्लक नसल्यामुळे भारतीय डॉक्टरांना त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करता आले नाही. या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.





















































