‘एशियाटिक’साठी आज मतदान, निवडणुकीवर पावसाचे सावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एशियाटिक सोसायटीची निवडणूक उद्या 4 जुलै रोजी होणार आहे. मतदान सकाळी 10 ते 4 या कालावधीमध्ये एशियाटिक सोसायटीच्या कार्यालयात होईल. 27 सप्टेंबरपर्यंतच्या अर्जदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यानुसार एकूण 2530 सदस्य मतदान करू शकणार आहेत. मात्र उद्या रेड अलर्टमुळे निवडणुकीवर पावसाचे सावट दिसून येत आहे.

सदस्य नोंदणीवरून एशियाटिकची निवडणूक वादाच्या भोवऱयात सापडली होती. अन्य साहित्य-सांस्कृतिक संस्थाप्रमाणे ‘एशियाटिक’वरही ताबा मिळवायचा आरएसएस आणि भाजप पुरस्कृत पॅनेलचा प्रयत्न दिसून आला. त्याविरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला. त्यानंतर आधी धर्मादाय आयुक्त आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले. धर्मादाय आयुक्तांनी पाच सदस्यांची एक उपसमिती नेमून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. त्यानंतर उच्च न्यायालयानेही धर्मादाय आयुक्तांच्या निकालाला स्थगिती देण्यास नकार देत निवडणूक घेण्यास सांगितले.

अनेक मृत सदस्यांची नावे यादीत

एशियाटीक सोसायटीने 2530 सदस्यांची मतदार यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. मात्र यामध्ये अनेक मृत सदस्यांची नावे आहेत. त्यामुळे ही यादी सदोष असल्याची टीका एशियाटिकचे सदस्य धनंजय शिंदे यांनी केली. यादी अपडेट नसल्याने निवडणुकीत घोटाळे होणार आणि ही निवडणूक चोरली जाणार, असे धनंजय शिंदे यांनी म्हटले.

तिरंगी लढत… 19 जागांसाठी 49 उमेदवार

एशियाटिक सोसायटीच्या 19 जागांसाठी 49 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांचे ‘सेव्ह एशियाटिक’ पॅनेल आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचे ‘एशियाटिक टुमारो’ पॅनेलमध्ये निवडणूक रंगणार आहे. सात उमेदवार स्वतंत्र उभे राहिल्याने या तिरंगी लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. उपाध्यक्षपदासाठी ‘सेव्ह एशियाटिक’ पॅनलकडून ए. डी. सावंत, अर्जुन डांगळे, दीपक पवार, सुनील कदम, तर ‘एशियाटिक टुमारो’ पॅनलमधून रमेश पतंगे, डॉ. संजय देशमुख, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, डॉ. नितीश भारद्वाज हे उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. अरुण शंकर, नॉबी परियाराम, शोर्मिष्ठा मुखर्जी हे स्वतंत्र पॅनेलमधून उपाध्यक्षपदासाठी लढत आहेत.