सूर्य पाणीपुरवठा जलवाहिनीला भगदाड; लाखो लिटर पाण्याची नासाडी, भरधाव ट्रेलरच्या धडकेमुळे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बावळ येथे शुक्रवारी पहाटे एका भरधाव ट्रेलरने धडक दिल्यामुळे वसई-विरार शहर पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पाच्या मुख्य पाइपलाइनला भगदाड पडले. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. पाइपलाइन फुटल्याने पाण्याचे 20 ते 25 फूट उंच फवारे उडत होते.

महामार्गालगत वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सूर्या योजनेची मुख्य पाइपलाइन टाकण्यात आली आहे. शुक्रवारी विरारजवळील बावळ परिसरात ट्रेलरच्या धडकेत पाइपलाइन फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

या घटनेची माहिती वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला मिळताच घटनास्थळी धाव घेत पाइपलाइन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

पाणी गाळून पिण्याचे आवाहन

सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरात आधीच गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यातच आता पाइपलाइन फुटल्याने पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा तसेच पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.