Ratnagiri News – निसर्ग बदलतोय…रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य धोकादायक ठिकाणांचा प्रशासन शोध घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरडप्रवण क्षेत्राच्या व्यतिरिक्त अन्य भागातही भूस्खलन होण्याच्या घटना घडत आहेत. खेड तालुक्यात दहिवली येथे घडलेली घटना हे ताजं उदाहरण आहे. निसर्गात होणारे बदल लक्षात घेत भविष्यातील धोके टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील अशी धोकादायक ठिकाणे आणि त्या परिसरात राहणाऱ्या लोकवस्तीचा शोध घेण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाने हाती घेतले आहे.

दरडप्रवण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून दरवर्षी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवत असते. दरडप्रवण क्षेत्राच्या पलीकडे जाऊन आणखी काही ठिकाणी भूस्खलनाचा धोका निर्माण होत आहे. खेड दहिवली येथील शेलारवाडी येथे दरड कोसळून एका घरातील दोघांचा मृत्यू झाला होता. दरडप्रवण क्षेत्रात न येणाऱ्या ठिकाणीही दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा ठिकाणांचा शोध घेतला जात आहे.

बेसुमार वृक्षतोड
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी झाडांची कत्तल होत आहे. मुंबई-गोवा महामार्ग आणि मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या रूंदीकरणात लाखो झाडे तोडली गेली. या सर्व वृक्षतोडीचा आणि जंगलात होणाऱ्या बेकायदेशीर वृक्षतोडीचा निसर्गावर परिणाम होत आहे.

निवारा केंद्र प्रलंबित
निसर्ग आणि तोक्ते वादळाच्या तडाख्या नंतर जिल्ह्यात नागरिकांच्या स्थलांतरणासाठी निवारा केंद्राचा प्रश्न उपस्थित झाला. रत्नागिरी जिल्ह्यात २१ निवारा केंद्र मंजूर झाली होती. मात्र जागेअभावी निवारा केंद्र बेघर होती. आता २१ पैकी १८ निवारा केंद्रांना जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, निवारा केंद्र उभारणीचे काम प्रलंबित आहे. उर्वरित तीन निवारा केंद्रांना अद्याप जागा मिळालेली नाही.