
इंधनाच्या वापरामुळे जुन्या वाहनांचे नुकसान झाल्यास वाहन उत्पादक कंपन्या ग्राहकांना भरपाई देणार का, असा थेट सवाल आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. जुन्या वाहनांमध्ये ई-२० इंधनाच्या वापराबाबत चिंता व्यक्त करत केजरीवाल यांनी देशातील २९ वाहन उत्पादक कंपन्यांना पत्र लिहिले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दिल्लीत एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांनी मारुती, टोयोटा आणि हिरो या तीन कंपन्यांना स्वतंत्र पत्रे पाठवली आहेत. या कंपन्यांनी नुकतेच एका सरकारी पत्रकार परिषदेत ई-२० इंधनामुळे जुन्या वाहनांना कोणताही त्रास होणार नसल्याचा दावा केला होता. मात्र याच कंपन्यांच्या ओनर्स मॅन्युअलमध्ये जुन्या वाहनांसाठी ई-१० पेक्षा जास्त इथेनॉल असलेले इंधन वापरू नये, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले असल्याकडे केजरीवाल यांनी लक्ष वेधले.
या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी कंपन्यांना दोन मुख्य प्रश्न विचारले आहेत. २०२३ पूर्वी बनवलेल्या वाहनांमध्ये ई-२० इंधन वापरता येईल का, हे कंपन्यांनी जनतेला स्पष्ट करावे. तसेच जर ई-२० च्या वापरामुळे वाहनाच्या मायलेजमध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली किंवा वाहनाच्या कोणत्याही भागाचे नुकसान झाले, तर कंपनी त्या नुकसानीची भरपाई देणार का, अशी विचारणा त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.



























































