Ratnagiri News – सोवेलीत अतिवृष्टीमुळे गुरांचा गोठा जमीनदोस्त; 3 जनावरे दगावली, शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यात सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोवेली येथील एका गरीब शेतकऱ्याचा गुरांचा गोठा पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. सोवेली येथील सुतारवाडीत राहणारे होतकरू शेतकरी अनंत सोविलकर यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी आपल्या गोठ्यात दोन गायी, एक बैल आणि एक वासरू अशी एकूण चार गुरे बांधली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास पावसाची संततधार सुरू असतानाच पहाटेच्या वेळी हा गोठा अचानक कोसळला. जनावरांच्या हंबरण्याचा आवाज ऐकून सोविलकर कुटुंबीयांना जाग आली. त्यांनी तात्काळ गावातील रहिवाशांना गोळा केले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे पवार, सरपंच जयेश मानकर, पोलीस पाटील महमद पावसकर आदींनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

रात्रीचा अंधार आणि पाऊस यामुळे सुरुवातीला मदतकार्यात अडथळे आले, मात्र सकाळ होताच ग्रामस्थांनी ढिगारा बाजूला करण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने या दुर्घटनेत दोन गायी आणि एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. या चार जनावरांपैकी केवळ एक छोटे वासरू सुदैवाने वाचले असले, तरी ते गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर उदरनिर्वाहाचे साधन असलेली जनावरे दगावल्यामुळे या गरीब शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या मूक जनावरांच्या मृत्यूमुळे सोविलकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. संबंधितांनी या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून पीडित शेतकऱ्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.