
सलग आठवडाभर कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. तर बुधवारी २ तास कोसळलेल्या पावसाच्या जोरदार सरीनी सगळीकडे पाणीच पाणी केले. भारजा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले. मंडणगड शहरात गटारातील पाणी रस्त्यावर आले होते. यावेळी मंडणगड शहरानजीक असलेल्या भिंगळोली गावातील ओहोळाला आलेल्या पाण्याने समर्थनगर येथील नागरी वस्तीमध्ये पाणी आले. तर शहरातील नवीन काँक्रीट रस्त्याला मध्येच भगदाड पडल्याचीही घटना घडली आहे.
मंडणगड तालुक्यात आठवडाभर कोसळणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे माती भुसभुशीत होऊन झाडे मुळासकट कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे घरावर झाडे पडून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत तालुक्यात पावसाचा जोर कायम असुन बुधवारी सरासरी 1555 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथील शवविच्छेदन गृहावरील पत्रा शेड उडाल्याने नुकसान झाले. या शिवाय भिंगळोली येथील भूमिअभिलेख कार्यालयावर २ झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.
शहरात नव्याने करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याला बांधण्यात आलेल्या गटाराच्या चुकीच्या कामाचा फटका वाहतुकीला बसला कारण पावसाचे पाणी गटारातून न जाता रस्त्यावरून वाहु लागले. त्यामुळे रस्त्यावरुन मार्गस्थ होणाऱ्या वाहनांना याचा फटका बसला. अनेक गावात रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे वाहतूकीवर परिणाम झाला तर विजेचे पोल आडवे झाल्याने तेथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अशी गावे अजूनही कित्येक गावे ही अंधारातच आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते खचण्याच्या घटना तसेच रस्त्यावर भेगा पडण्याचे प्रकार घडल्याने तेथील वाहतूक अजुनही सुरू झालेली नाही. काही ठिकाणी एस. टी. बसेस च्या फेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. विज खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले. ग्रामीण भागात संपर्क साधणे मुश्किल झाले आहे. तर रस्त्यावर एस.टी. बसेस ची वाहतूक बंद असल्याने शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंडणगड शहरात तालुका ठिकाणी शाळेत जाण्यासाठी गैरसोय झाली आहे.





























































