
अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणगी चोरीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून, यावर १३ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली असून, विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
वकील अजय कुमार राय आणि दिनेश कुमार यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कारभारातील आर्थिक अनियमितता आणि देणगी चोरीप्रकरणी तत्काळ एफआयआर नोंदवून सीबीआयच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडे हा तपास सोपवला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी आधीच एसआयटी स्थापन केली असली तरी, कोणताही नियमित एफआयआर किंवा फौजदारी गुन्हा दाखल न करताच या एसआयटीने तपास कसा सुरू केला, असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणातील आरोप अत्यंत गंभीर असून पुराव्यांशी छेडछाड होण्याची किंवा ते नष्ट केले जाण्याची दाट शक्यता असल्याने यावर जलद सुनावणी व्हावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.




























































