
नागपूरच्या रामटेकमधील श्री राम मंदिर देवस्थानावर विश्वस्त नियुक्त करण्याच्या विधेयकावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना आज विधानसभेत जेरीस आणले. अयोध्येच्या राम मंदिराप्रमाणे चंपतराय आणि मिश्रांसारख्यांना रामटेकच्या मंदिरावर घेऊ नका. ‘राम का नाम बदनाम ना करो’ अशा कोपरखळ्या, खोचक, बोचरे टोले आणि शाब्दिक फटकारे मारत सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले.
नागपूरच्या रामटेकमधील श्रीराम मंदिर देवस्थानावर विश्वस्त नेमण्याबरोबर मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या संदर्भातील विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी आणले होते. विधेयकाला मंजुरी देण्यापूर्वी सभागृहातील चर्चेत विरोधकांनी ‘शालजोडीतले’ लगावत सत्ताधारी सदस्यांना हैराण करून सोडले.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे विधेयक मंजुरीसाठी आणल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी सरकारला सवाल केला. रामटेकच्या मंदिराच्या कमिटीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांना घ्याल ते प्रामाणिक घ्या, विश्वासू घ्या, देवावर श्रद्धा असलेले घ्या. चंपतराय-अनिल मिश्रासारखे घेऊ नका. ज्या रामाने तुम्हाला सत्तेत आणले त्या अयोध्येत रामलल्लाला लुटण्यामध्ये आपण मागेपुढे पाहिले नाही. हे प्रकरण फार मोठे आहे. आता त्याची सुरुवात झाली आहे, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांनी हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याची मागणी केली.
रामटेकच्या रामाचा भक्त कोण?
शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी या विधेयकातील त्रुटींवर बोट ठेवले. रामटेक राम मंदिरावर विश्वस्त होण्यासाठी रामटेकच्या श्रीरामाचा भक्त आहे असे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट आहे. त्यावरून वरुण सरदेसाई यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली. रामटेकच्या श्रीरामाचा भक्त असलेले प्रतिज्ञापत्राची तपासणी करणारे न्यायमूर्ती कोण आहेत? माझ्यासाठी राम एकच आहे. रामटेकचा आणि दुसरा राम वेगळा नाही. या राम मंदिराच्या विश्वस्तांना मानधन मिळणार आहे. आम्ही मंदिरात गेलो तर देवाला देण्याची भावना असते. विश्वस्तांनीच मंदिराकडून घ्यायचे ही भावना चुकीची असल्याचे मत व्यक्त केले.
जितेंद्र आव्हाडांनी गाणे गायले…
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर सुरात, ‘देखो ओ दिवानो यें काम ना करो… राम का नाम बदनाम ना करो…और खुदमे का ‘रावण’ जागा ना करो…’ हे गाणे गायला सुरुवात केली. त्यावर सभागृहात गाणे गायला परवानगी नाही याची आठवण अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी करून दिली.
अयोध्येसारखे प्रकरण घडवणाऱ्यांना रामटेकच्या राम मंदिराच्या कमिटीवर घेऊ नका. वरून राम आणि पोटातून-आतून काळाराम असे असता कामा नये. मंदिराच्या कमिटीवर प्रामाणिक आणि देवावर श्रद्धा असलेले घ्या, असे भास्कर जाधव म्हणाले.
रामटेक राम मंदिरावर स्थानिक आमदार सदस्य म्हणजे मंत्री आशीष जयस्वाल यांनी स्वतःच्या मतदारसंघात मंदिरावर सदस्य होण्यासाठी स्वतः आणलेले विधेयक. याला भाग्य म्हणायचे की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट? असे वरुण सरदेसाई म्हणाले.
‘ह’ आणि ‘राम’ असलेल्या लोकांना तिथे काम करण्याची संधी देणे हे कायद्याची पळवाट आहे. एखाद्या प्रकरणात एफआयआर झाला तर कोर्टाच्या निकालाची वाट न बघता विश्वस्त पद जाईल अशी विधेयकात तरतूद करा, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
‘अगर पहेरा देनेवाला पुत्ता चोरो को देखकर न भोंके तो समझना चाहिये कि वो चोरोंको जानता है…’ असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. त्यामुळे विश्वस्त मंडळावरील नेमणूक महत्त्वाची आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
























































