बच्चू कडू कामात व्यत्यय आणतात… ‘उत्तर देणारे तुम्ही कोण?’ विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषदेत शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यात पुन्हा एकदा जोरदार जुंपली. ‘बच्चू कडू कामकाजात वारंवार व्यत्यय आणतात. हे बरोबर नाही’, असे वक्तव्य आमदार दरेकर यांनी केले. यावर ‘उत्तर देणारे तुम्ही कोण?’ असा सवाल बच्चू कडू यांनी केला. दोघांमधील वाद वाढतच गेल्याने सभापती राम शिंदे यांना हस्तक्षेप करीत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमधील वाद काही वेळ सुरूच राहिला. एकाच अधिवेशनात दोघांमध्ये वाद होण्याची ही तिसरी वेळ आहे.

विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासांत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणामुळे आदिवासी महिला आणि नवजात बालकाच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. सभापती राम शिंदे यांनी त्यांना मुद्द्यावर बोलण्याच्या सूचना दिल्यानंतर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उत्तर देण्यास उभे राहिले. याचवेळी बच्चू कडू यांनी आक्षेप घेत सकाळच्या बैठकीत त्यांना प्रश्न मांडण्यासाठी केवळ पाच मिनिटांचा वेळ दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभापती राम शिंदे यांनी सकाळची बैठक आणि सध्याचे कामकाज वेगळे असल्याचे स्पष्ट केले, मात्र कडू यांनी आक्षेप कायम ठेवला.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडू यांची कामकाजात वारंवार व्यत्यय आणण्याची पद्धत योग्य नसल्याचे सांगत आक्षेप घेतला. त्यावर बच्चू कडू यांनी ‘तुम्ही कोण उत्तर देणारे?’ असा सवाल करत दरेकरांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर बच्चू कडू आणि प्रवीण दरेकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.