
कोकणात जुलै महिना म्हणजे मुसळधार पाऊस, धबधबे, हिरवाई आणि ढगांनी व्यापलेले आकाश असे वातावरण असते. मात्र यंदा संगमेश्वर तालुक्यात निसर्गाने वेगळेच रूप दाखवले आहे. पावसाळ्याचा मध्य असतानाही पावसाने दडी मारली असून. पहाटेपासून संपूर्ण परिसर दाट धुक्याच्या चादरीत हरवून जात आहे. सकाळी पडणारे घनदाट धुके आणि त्यानंतर दुपारी पडणारे कडक ऊन यामुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत.
संगमेश्वर शहरासह मंगळवारी पहाटेपासून आजूबाजूच्या डोंगररांगा, दऱ्या, झाडे, घरे आणि रस्ते दाट धुक्याने पूर्णपणे झाकले गेले होते. काही ठिकाणी इतके दाट धुके होते की काही मीटर अंतरावरील वस्तूही स्पष्ट दिसत नव्हत्या. मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना दिवसा देखील हेडलाईट सुरू करून प्रवास करावा लागला. वाहनांचा वेग कमी करून सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागत असल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
डोंगरांच्या कुशीत वसलेल्या संगमेश्वरचे निसर्गरम्य सौंदर्य या धुक्यामुळे अधिक खुलून दिसत होते. धुक्याच्या शुभ्र पडद्यामागे लपलेले डोंगर आणि झाडे पाहण्यासाठी अनेकांनी घराबाहेर पडून या दृश्याचा आनंद घेतला. काही नागरिकांनी या निसर्गरम्य वातावरणाचे छायाचित्रण आणि चित्रीकरणही केले. सोशल मीडियावर संगमेश्वरच्या धुक्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. मात्र या मनमोहक दृश्यामागील वास्तव वेगळेच आहे. सकाळी नऊ वाजल्यानंतर धुके हळूहळू विरळ होते आणि लगेचच कडक उन्हाची तीव्रता वाढू लागते. ढगाळ वातावरणाऐवजी निरभ्र आकाश आणि रखरखीत ऊन यामुळे हवेत उकाडा वाढत असून नागरिकांना अस्वस्थता जाणवत आहे. पावसाळ्यात अपेक्षित असलेला सततचा पाऊस आणि गारवा यंदा अनुभवायला मिळत नसल्याने हवामानातील हा बदल चर्चेचा विषय ठरला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील भातशेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. जुलै महिन्यात शेते पाण्याने तुडुंब भरलेली असावीत, अशी अपेक्षा असते. मात्र पावसाचा खंड, सकाळचे दाट धुके आणि दुपारचे कडक ऊन यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दमट वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करत आहेत.
हवामान अभ्यासकांच्या मते, पावसाळ्याच्या हंगामात दीर्घकाळ पाऊस न पडणे, पहाटे मोठ्या प्रमाणात धुके असणे आणि दिवसभर उन्हाची तीव्रता वाढणे ही बदलत्या हवामानाची लक्षणे मानली जातात. वातावरणातील तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याच्या स्थितीतील बदलांमुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवसांतील हवामानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुक्याने संगमेश्वरचे सौंदर्य जरी खुलवले असले, तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे चित्र चिंतेचे ठरत आहे. आता दमदार पाऊस कधी बरसणार, याकडे संपूर्ण तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत.



























































