
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या वादग्रस्त शो संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्याला तीव्र शब्दांत फटकारले असून, १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने समय रैनावर दिशाभूल केल्याचा आणि चुकीची विधाने केल्याचा ठपका ठेवला आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना समय रैनाची चांगलीच कानउघडणी केली. विहित वेळेत दंडाची रक्कम जमा न केल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सुनावणीदरम्यान समयच्या वकिलांनी दिलेले उत्तर वाचताना, ‘हे फेकून द्या’ अशा संतप्त शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच इतक्या उशिरा उत्तर का देण्यात आले, असा सवालही उपस्थित केला.
या प्रकरणी अमायकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) अपराजिता यांनी न्यायालयात बाजू मांडताना स्पष्ट केले की, या शोला विरोध करणारे समाजातील लोक पैशांसाठी किंवा नुकसानभरपाईसाठी नाही, तर आपल्या सन्मानासाठी लढत आहेत. इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये होस्ट समय रैना, रणवीर अल्लाबादिया आणि इतर इन्फ्लुएन्सर्सनी दिव्यांग मुले आणि व्यक्तींची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात न्यायालयाने प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, येत्या दोन आठवड्यांत या आदेशाचे पालन करून न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या कठोर कारवाईमुळे इंडियाज गॉट लेटेंट शोभोवतीचा वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.



























































