
शेजारच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून आईनेच 20 वर्षीय मुलीची हत्या केली. उल्हासनगरमधील भय्यासाहेब आंबेडकरनगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. अमृता गरड असे हत्या झालेल्या मुलीचे तर आशा गरड असे आरोपी आईचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृताला एका मुलाचे स्थळ आले होते. परंतु तिने या स्थळाला नकार दिला. आईने अमृताला नकार देण्याचे कारण विचारले असता, तिने शेजारी राहणार्या मुलावर प्रेम असल्याचे आईला सांगितले. मात्र शेजारी राहणार्या मुलाला चांगला कामधंदा नाही आणि चांगल्या स्थळाला आपली मुलगी नकार देते याचा भयंकर राग आशा गरड हिला आला. तिने या प्रेमसंबंधाला कडाडून विरोध केला. परंतु अमृताने त्या तरुणाशीच लग्न करेन, असे ठामपणे सांगितले. यातून अमृता व तिच्या आईचे रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणातून आशा हिने मुलगी अमृताचा गळा आवळला. त्यात तिचा गुदमरून मृत्यू झाला.
मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आशा आणि तिचे पती दत्ता यांना धडकी भरली. दत्ता गरड यांनी रात्रीच उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना कथन केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात पुढील तपासण्यासाठी पाठवला असून आईच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.





























































