ठाण्यात १४ ठिकाणी ‘मृत्यूची दरड’, घाटकोपर दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती, हजारो नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसामुळे घाटकोपरमध्ये दरड कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही तब्बल १४ ठिकाणी ‘मृत्यूची दरड’ असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. वागळे इस्टेटसह कळवा, मुंब्रा, घोडबंदर रोडजवळील डोंगरी पाडा अशा डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची भीती असून परिसरात राहणाऱ्या हजारो रहिवाशांवर भीतीची टांगती तल वार आहे. घाटकोपरच्या घटनेने तर जीव मुठीत धरून राहणाऱ्या रहिवाशांची झोपच उडाली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा या भागात मोठ्या प्रमाणावर डोंगरावरच आणि पायथ्याशीदेखील मोठ्या प्रमाणावर घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील बहुतांश घरे बेकायदा असून वर्षोनवर्षे नागरिक येथे राहत आहेत. मुंब्याचा डोंगर तर प्रसिद्ध असून त्याला लागूनच झोपडपट्ट्यांचे जाळे आहे. दरवर्षी महानगरपालिका पावसाळ्याच्या तोंडावर रहिवाशांना नोटिसा बजावते. पण प्रत्यक्षात त्यावर कोणताही कायमस्वरुपी तोडगा अद्यापी निघालेला नाही. स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटणाऱ्या ठाणे पालिकेला येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात सपशेल अपयश आले आहे.

भूमाफियांनी डोंगर पोखरून झोपड्या उभारल्या
ठाण्याच्या डोंगराळ पट्ट्यात गेल्या २० ते २५ वर्षांपासून बेकायदा वस्ती उभारण्यात आल्या आहेत. स्थानिक भूमाफियांनी अक्षरशः डोंगर पोखरून या झोपड्या विकल्या आहेत. वागळे इस्टेटसह कळवा आणि मुंब्रा परिसरातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात झोपड्या असून पाणी आणि वीज कनेक्शनदेखील सहज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पालिकेला झोपड्यांची संख्या माहीत नाही
दिवसेंदिवस डोंगराळ परिसरामध्ये झोपड्यांचे साम्राज्य वाढत जात आहे. या झोपड्यांमध्ये नेमके किती रहिवासी राहतात याचा आकडा पालिकेकडे नाही. अनेकांनी तर या ठिकाणी झोपड्या बांधून त्या भाड्याने दिल्या आहेत. यामध्ये परराज्यांतून आलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे.

हे आहेत डेंजर स्पॉट
गुरुदेव आश्रमजवळ, उपवन, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कळशीपाडा, आतकोनेश्वर नगर, पौंडपाड़ा, शिवशक्ती नगर, घोलाई नगर, वाघोबा नगर, भास्कर नगर, आझाद नगर, गावदेवी मंदिर परिसर, केणी नगर, सैनिक नगर, कैलास नगर.