
“कुणबी प्रमाणपत्र हेच देतात आणि रद्दही हेच करतात, असा फडणवीस सरकारचा बनवाबनवी कार्यक्रम सुरू आहे. सरकार मराठा समाजाला वेड्यात काढत असून आम्ही जातो आणि ते ऐकत नाहीत, असे चित्र निर्माण केले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी पाप केले असून त्यांना गोरगरीब मराठ्यांचा तळतळाट लागणार आहे,” असा हल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.
मराठा आरक्षण, रद्द करण्यात आलेले चार कुणबी प्रमाणपत्रे वैध करून देणे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी अकराव्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्यस्थी करूनही सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
























































