
उत्तर प्रदेशातील रस्ते विकास प्रकल्प, पूरस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार विकासाच्या नावाखाली मोठे प्रकल्प उभारत असले, तरी जमिनीवरील वस्तुस्थिती अत्यंत बिकट असल्याचा आरोप त्यांनी केला. राम वन गमन पथ आणि एक्सप्रेसवे प्रकल्पांवरून सरकारवर टीका करताना अखिलेश यादव म्हणाले की, “स्वतःचे खिसे भरता यावेत यासाठीच हे लोक हायवे बनवत आहेत.”
पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी वाराणसी, गोरखपूर आणि प्रयागराजमधील विकासकामांवरून सरकारवर जोरदार टीका केली. या शहरांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसानंतर सर्वत्र पाणी साचल्याचे ते म्हणाले. “पंतप्रधानांच्या संसदीय मतदारसंघात (वाराणसी) आणि मुख्यमंत्र्यांच्या शहरात (गोरखपूर) दोन्ही ठिकाणी सध्या होड्या चालत आहेत. एक शहर क्योटो बनत होते तर दुसरे स्पेन, परंतु प्रत्यक्षात विकासाच्या नावाखाली सर्व काही धूळफेक ठरले आहे,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
सहारनपूर येथील घटनेवरूनही अखिलेश यादव यांनी पोलिस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. पोलिस गुन्हेगार आणि दरोडेखोरांना पकडण्याऐवजी समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर छापे टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. सहारनपूरमध्ये पाडण्यात आलेल्या मशिदीबाबत बोलताना ते म्हणाले की, “देशात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय अस्तित्वात असताना इतक्या घाईघाईने मशीद पाडण्याची काय गरज होती?” सरकारने कायद्याची योग्य प्रक्रिया पाळली नाही, असा आरोप करत त्यांनी संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली.
























































