
हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासात एका दुर्मीळ योगायोगाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. कारण गांधी जयंतीनंतरच्या दुसऱ्या दिवशी (3 ऑक्टोबर 2026) टीम इंडिया एकाच दिवशी दोन देशांना धूळ चारण्यासाठी मैदानात उतरू शकते. एका बाजूला वनडे मालकेतील हिंदुस्थानविरुद्ध वेस्ट इंडिज असा तिसरा सामना मुल्लांपुरमध्ये रंगणार आहे. दुसरीकडे याच दिवशी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारल्यास आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. आशियाई क्रीडा स्पर्धेचा अंतिम सामना जपानच्या निशिल येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे खेळला जाणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले असून, यामध्ये संजू सॅमसन, इशान किशन, जसप्रीत बुमराह आणि युवा वैभव सूर्यवंशी यांसारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील व्यस्ततेमुळे हे सर्व खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेचा भाग असणार नाहीत, ज्यामुळे बीसीसीआयला दोन स्वतंत्र संघ तयार करावे लागत आहेत. त्यामुळे क्रीडा विश्वात एकाच दिवशी टीम इंडिया दोन वेगवेगळ्या देशांविरुद्ध मैदानात उतरेल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी 12 सप्टेंबर 1998 रोजी कॉमनवेल्थ गेम्स आणि सहारा कपदरम्यान असाच अनोखा योगायोग जुळून आला होता.



























































