कार्ले खिंड-रेवस मार्गावरील एसटी सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू करा; ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिबाग तालुक्यातील काल खिंड-हाशिवरे-रेवस मार्गावरील बंद असलेली एसटी सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू करा, अशी मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनने एसटी महामंडळाकडे केली आहे. संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना पत्र लिहिले आहे.

कार्ले खिंड-हाशिवरे-रेवस या अत्यंत रहदारीच्या मार्गावरील नवीन रस्ते उभारणीच्या कामामुळे मागील अनेक महिन्यांपासून एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नोकरदार आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी येत आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवापूर्वी कार्ले खिंड-हाशिवरे-रेवस मार्गावरील एसटी सेवा सुरू करण्यात यावी, असे ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनने म्हटले आहे.

संघटनेच्या निवेदनाची दखल घेत महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. कुसेकर यांनी वाहतूक शाखेच्या महाव्यवस्थापकांना पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. संघटनेने निवेदनाच्या प्रती महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन मैंद, कोकण विभागीय व्यवस्थापक श्रीकांत पळसुले आणि सुहास चोरे यांनाही पाठवल्या आहेत. तसेच चंद्रकांत मोकल यांनी रायगडचे विभाग नियंत्रक सुहास चोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सेवा सुरू करण्यासाठी सहकार्याची विनंती केली आहे.