
सॅमसंग इंडियामध्ये आता कर्मचारी कपातीची कुऱ्हाड पडणार असून, वाढता उत्पादन खर्च, महागलेल्या मेमरी चिप्स हे यामागील मुख्य कारण असल्याचे म्हटले जात आहे. टीव्ही आणि घरगुती उपकरणे या व्यवसायातील अंदाजे 80 ते 100 अधिकाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे वृत्त आहे. ही कर्मचारी कपात प्रामुख्याने संचालक, टीम लीड, शाखा व्यवस्थापक आणि क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होणार आहे.
मेमरी चिप्सच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे ही कर्मचारी कपात केली जात असल्याचे म्हटले जात आहे. अलीकडे मेमरी चिप्सच्या किमती या दुपटीने वाढल्या आहेत. त्यामुळेच टीव्ही आणि इतर इलेक्ट्राॅनिक वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च देखील वाढला आहे. त्यामुळेच कर्मचारी कपात करण्याचे म्हटले जात आहे. शिवाय रुपयाच्या घसरणीमुळे सुद्धा आयात केलेल्या घटकांचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. त्यामुळेच या खर्चाचा ताळमेळ बसवणे हे कंपनीसाठी आता कठीण होऊन बसले आहे. आगामी काळात करण्यात येणारी कर्मचारी कपात ही टप्प्याटप्याने करण्यात येत असल्याचे समजते.
सध्याच्या घडीला सॅमसंगच्या इलेक्ट्राॅनिक्स व्यवसायातील विक्री आणि विपणन विभागात सुमारे 550 ते 600 अधिकारी आहेत. यामध्ये आता जवळपास 25 टक्के कर्मचाऱ्यांवर भविष्यात परिणाम होण्याची शक्यता कंपनीकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या या कर्मचारी कपातीमधून सॅमसंगच्या स्मार्टफोनमधील कर्मचाऱ्यांना मात्र वगळण्यात आले आहे. दरम्यान हिंदुस्थानातील स्मार्टफोन बाजारपेठेतही विक्रीचे प्रमाण कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. खर्च कमी करण्यासाठी सॅमसंग इंडिया काही प्रादेशिक कार्यालयांचे विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे.
























































