
येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा सौदी अरोबियाला लक्ष्य केले. राज्याच्या दक्षिण भागातील नागरी आणि आर्थिक सुविधांना लक्ष्य करण्यात आले. पायाभूत सुविधा आणि तेल प्रकल्पांना लक्ष्य करत केलेल्या हल्ल्यात 73 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला व बालकांचा समावेश आहे. दक्षिण प्रांतातील अनेक ऊर्जा प्रकल्प आणि नागरी सुविधांवर हुथींनी हल्ला केल्याचे सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने सांगितले.
सौदी अरेबियाने येमेनच्या दीर्घकाळ चाललेल्या यादवी युद्धात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यातील तणाव वाढत आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार,आभा, जाझान, नज्रान आणि खमिस मुशैत येथील नागरी आणि आर्थिक सुविधांवर हे हल्ले झाले, असे सौदी-नेतृत्वाखालील आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-माल्की यांनी सांगितले. या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील अनेक तेल सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या ठिकाणी आगीही लागल्या. हे हल्ले म्हणजे राज्याच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन तसेच नागरिक आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी थेट धोका असल्याचे तुर्की अल-मस्की यांनी म्हटले आहे.

























































