
राज्यातील बोलघेवड्या भाजपा सरकारच्या कृतिशून्य कारभाराचा व मराठवाड्यातील विकासाच्या अनुषेशाचा सडेतोड पंचनामा करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या तुमसे ना हो पायेगा या झंझावती अभियानंतर्गत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ११ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. यावेळी जिल्ह्यातील विकासाच्या बकाल अवस्थेच्या निषेधार्थ खा.संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी दिली.
नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या तुमसे ना हो पायेगा या सत्ताधार्या विरोधातील आंदोलनात्मक अभियानाची नांदेड जिल्ह्यातील रूपरेषा जाहीर करण्यात आली.
त्यानुसार येत्या ११ सप्टेंबर रोजी शुक्रवारी सकाळी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत नांदेडमध्ये येणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते, माजी विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांच्यासह मराठवाड्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व आमदार उपस्थित असणार आहेत.
यनिमित्ताने नांदेड जिल्ह्यातील व शहरातील घोषित परंतु अपूर्ण असलेल्या विकास कामाच्या पूर्णत्वासाठी शिवसेनेच्या वतीने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १० वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड धरणे आंदोलन करण्यात येणार असून याप्रसंगी शिवसेना नेते, खा.संजय राऊत यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.
सवंग लोकप्रियतेसाठी प्रकल्पाच्या भरमसाठ घोषणा, विकासाच्या मोठमोठ्या गप्पा, पण प्रत्यक्षात कामांचा मात्र ठणाणा अशी संतापजनक स्थिती असलेल्या नांदेड जिल्ह्यातील विकासाच्या अनुषेशाच्या ज्वलंत प्रश्नावर दुपारी १ वाजता शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत हे जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेवून सविस्तर आढावा घेणार आहेत.
त्यानंतर दुपारी ३ वाजता शिवसेना नेते, खा.संजय राऊत, माजी विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी नांदेड जिल्ह्याच्या विविध भागात प्रत्यक्ष भेटी देवून घोषित कामे, मंजूर कामे, अर्धवट, अपुर्या व बोगस कामांची पाहणी करणार आहेत.तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेणार आहेत.
विकासाच्या बाबतीत मराठवाड्यावर अन्याय करणार्या व नांदेड जिल्ह्यातील विकासाची देखील दुर्दशा करणार्या थापाबाज सत्ताधार्यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे वेशीवर टांगताना विकासाच्या अनुषेशाचा जाब विचारण्यासाठी तमाम नागरिकांनी ११ सप्टेंबर रोजी आयोजीत जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख दयाल गिरी, युवासेना विभागीय सचिव महेश खेडकर, पुरुषोत्तम धोंडगे, धोंडू पाटील, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, महानगरप्रमुख मनोज यादव, जिल्हा प्रवक्ता डॉ.बालाजी पेनुरकर, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, पिंटू सुनपे, विजय कल्याणकर आदींची उपस्थिती होती.
























































