गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, वाहतूककोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पालघरसह उपनगरांमधील गणेशभक्त कोकणच्या दिशेने रवाना होणार आहेत. मात्र या काळात कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूककोंडी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने मुंबई -गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. परिवहन विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश लागू केला आहे. या आदेशामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळामार्फत कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणावर जादा बसेस सोडल्या जातात. याशिवाय भक्त वाहनांनी कोकणात पोहचतात. दरम्यान महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्यामुळे गणेश भक्तांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ही संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या काळात 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन क्षमता असलेली ट्रक, ट्रेलर्स आणि रेती/वाळू वाहतूक करणारे डंपरसारख्या सर्व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

या दिवशी बंदी

– 11 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजल्यापासून 15 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत
– 18 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत.
– 19 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासून 20 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत.
– 25 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासून 26 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत.

या वाहनांना सवलत

अवजड वाहनांवर निर्बंध असले, तरी जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवांवर याचा परिणाम होणार नाही याची खबरदारी शासनाने घेतली आहे. त्यात जेएनपीटी आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात होणाऱ्या मालाची वाहतूक करणारी वाहन, दूध, पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, औषध, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला, अन्नधान्य व नाशवंत माल वाहून नेणारी वाहने, रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन व इतर अत्यावश्यक सेवांची वाहने. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे आणि दुरुस्तीचे साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे.

सवलतीसाठी प्रवेशपत्र आवश्यक

अत्यावश्यक किंवा जीवनावश्यक सेवेसाठी सवलत दिलेल्या वाहनांना वाहतूक पोलीस/महामार्ग पोलिसांचे प्रवेशपत्र आवश्यक असणार आहे. तसेच, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि संबंधित जिह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.