अमेरिकेचा इराणच्या तेलवाहू जहाजांवर हल्ला, पाच टँकर उद्ध्वस्त; इराणचे चोख प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आता आणखी चिघळला आहे. अमेरिकेने ओमान आणि खर्ग बेटाजवळ इराणच्या ५ तेलवाहू जहाजांवर जोरदार हल्ले चढवले. इराणने अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सलग दोन दिवस हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर इराणनेही जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले आहे.

इराणच्या ५ जहाजांचे मोठे नुकसान
अमेरिकन सैन्याने इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी (IRGC) संबंधित तेल वाहतूक करणाऱ्या ५ जहाजांना लक्ष्य केले. यामध्ये ओमानच्या आखातातील ‘एम/टी काविझ’ (M/T Kaviz), ‘एम/टी चारमिनार’ (M/T Charminar), ‘एम/टी होरायझन १’ (M/T Horizon 1) व ‘एम/टी रिएस्को’ (M/T Riesco) आणि खर्ग बेटाजवळील ‘एम/टी डेरिया’ (M/T Derya) या जहाजांचा समावेश आहे. अमेरिकेने हल्ला करण्यापूर्वी या जहाजांवरील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. या हल्ल्यात ही पाचही जहाजे पूर्णपणे निकामी झाली आहेत. या जहाजांचा वापर इराण दहशतवादी आणि प्रॉक्सी गटांना निधी पुरवण्यासाठी करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

इराणचा जॉर्डनमधील अमेरिकन तळावर हल्ला

अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणने तातडीने जॉर्डनमधील ‘अल अझरक’ (Al Azraq) हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला चढवला. ‘अल जझीरा’च्या वृत्तानुसार, जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणने डागलेल्या २० पैकी १८ क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट केले, तर उर्वरित दोन क्षेपणास्त्रे निर्जन भागात कोसळली. मात्र, आयआरजीसीने (IRGC) या तळावर भीषण हल्ला चढवून अमेरिकन लढाऊ विमानांचे हँगर उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.