
गणेशोत्सवातील कचऱ्याचे शाश्वत व शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’च्या समन्वयाने ‘प्रसाद ते ऊर्जा’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मंडळाच्या प्रसाद कक्ष व अन्नछत्रामधून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर बायोमिथेनेशन प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. या प्रक्रियेतून निर्माण होणारी वीज महापालिकेच्या रुग्णालयांना मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत मंडळाच्या प्रसाद वितरण आणि भोजन सुविधांमधून दररोज सुमारे ८ ते १० मेट्रिक टन अन्न व जैविक कचरा निर्माण होण्याचा अंदाज आहे. या कचऱ्याचे निर्मितीस्थळी योग्य विलगीकरण करून, वाहनांद्वारे तो महापालिकेच्या नायर रुग्णालय, कस्तुरबा, जीटीबी आणि शीव रुग्णालय येथील बायोमिथेनेशन प्रकल्पांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. उत्सव काळात ७७४४ युनिट वीजनिर्मितीचे लक्ष्य आहे.





























































