मनतरंग – मनोकायिक विकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या सौदागर
[email protected]

‘टोकाचा आदर्शवाद’ अपेक्षांचं ओझं घेऊन येतो आणि हा ताण मनोकायिक विकारांमध्ये दिसू लागतो. मन आणि शरीराने खचत जात मानसिक ताण, नैराश्य, चिंता यांनी व्यक्ती ग्रासून जाते.

अर्चना (नाव बदलले आहे) ही अत्यंत संवेदनशील आणि होतकरू अशी लोकप्रिय शिक्षिका होती. एका प्रतिष्ठित अशा शाळेत ती दहाएक वर्षे अध्यापनाच काम करत होती. तिचा प्रत्येक दिवस हा वेगळा आणि चैतन्यमय असायचा. “अर्चना ही फक्त आदर्श शिक्षिकाच होण्यासाठी जन्माला आली आहे’’ असं कौतुकाने तिचे आई-वडील तिच्याबद्दल म्हणत असत. अशा या अर्चनाला काही महिन्यांपासून तीव्र अंगदुखीने आणि अचानक होणाऱया सर्दीतापाने ग्रासलं होतं. शाळेतून आल्यावर किंवा शाळेत जाताना तिला ही तीव्रतेने जाणवे आणि ती मग त्या दिवशी रजा घेई. त्यामुळे तिच्या कामाच्या दांडय़ा भरपूर व्हायला लागल्या होत्या. त्यामुळे तिच्यावर कामाचा ताणही वाढला. हल्ली तिच्या अंगदुखीमध्ये प्रचंड वाढ झाली होतीच त्याचबरोबर हाताचे आणि पायाचे स्नायू दुखणं, नंतर येणारा ताप, रात्रीची झोप कमी आणि वाईट स्वप्नं येणं या लक्षणांमुळे तिच्या डॉक्टरांनी समुपदेशनाचा सल्ला दिला.

“फक्त तुला शारीरिकच तक्रारी आहेत का?’’ असं तिला विचारल्यानंतर ती पटकन “नाही’’ असं म्हणाली. “मला समुपदेशनासाठी यायचंच होतं. मला गेलं वर्ष शाळेकडून भरपूर ताण आहे. मॅनेजमेंट बदलल्यामुळे गोष्टी कठीण झाल्यात. मला अजूनही पे रोलवर घेतलं नाहीये. कामाचा त्रास, त्यात शाळेत होणारं राजकारण आणि सगळ्यांचं बदललेलं वागणं यामुळे मला शाळेत जावंसं वाटत नाही. या गोष्टी घरी सांगितल्या तर बाबांनी खिल्ली उडवली आणि मला म्हणाले फक्त या कारणासाठी समुपदेशन घ्यायची गरज नाही. प्रत्येकाला नोकरीत तडजोडी कराव्या लागतात.’’ क्षीण हसत अर्चना म्हणाली. तीच्या या हसण्यात अर्चनाची झालेली मानसिक घालमेल आणि दबलेल्या भावनांमुळे झालेला शारीरिक त्रास जाणवला.

तिच्या शारीरिक आणि मानसिक तक्रारींविषयी जाणून घेतल्यावर तसंच तिच्याशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की, तिला होणारा शारीरिक त्रास हा ‘मनोकायिक विकारांकडे’ म्हणजेच ‘सायको सोमॅटीक डिसॉर्डर्स’कडे निर्देशित करत होता. कारण तिच्या सर्व शारीरिक तपासण्या या सामान्य होत्या, पण तिच्या शारीरिक तक्रारी काही कमी होत नव्हत्या. उलट त्यांचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्याचं मूळ हे ‘ताण’ जरी असलं तरी अर्चनाचं ‘अति संवेदनशील’ असणं हेही होतं.

आता मनोकायिक विकारांबद्दल सोप्प्या शब्दांत सांगायचं झालं तर जे विकार मन आणि शरीराचा संबंध असलेले विकार. म्हणजेच ज्या शारीरिक तक्रारींमध्ये मानसिक ताण, नैराश्य किंवा चिंता यांसारखे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात त्याला मनोकायिक विकार म्हटलं जातं. यामध्ये व्यक्तीला तिच्या शरीराचा जो अवयव जास्त संवेदनशील असतो, त्या अवयवाला ताण/चिंता/नैराश्य यामुळे संवेदना होण्याची शक्यता असते. बऱयाच वेळा या व्यक्तींना पोटदुखी, डोकेदुखी, छातीत दुखणं, गुडघेदुखी या तक्रारी असतात ज्या तणावाच्या प्रसंगी सुरू होतात आणि काही काळ सुरूच राहतात.

अर्चनासंबंधी बोलायचं झालं तर तिला ही समस्या जाणवत होती ती तिच्या मानसिक जडणघडणीशी जास्त संबंधित होती. ती पहिल्यापासून आदर्शवादी स्वभावाची होती. जे काही करायचं ते व्यवस्थित आणि इतरांना आवडेल असं करायचं अशा पद्धतीने ती कामांना सुरुवात करायची. त्या वेळी ‘माझ्या कामाचं इतरांनी कौतुक करायला हवं आणि समजा ते नाही झालं तर मी कमी आहे’ अशी तिची वैचारिक धारणा बनत गेली. त्याचं मूळ तिच्या वडिलांमध्ये होतं. ते आदर्शवादी होते आणि त्यांनी अर्चनाकडून तशाच अपेक्षा बाळगल्या होत्या. तीच सवय तिला लागली होती आणि त्यामुळे तिच्या इतरांकडून अपेक्षाही वाढल्या. पण शाळेच्या सहकाऱयांनी तसेच वरिष्ठांनी तिच्या आदर्शवादी विचारांना आणि सतत कौतुक ऐकण्यासाठी अपेक्षित असलेल्या तिला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. त्यातून अर्चना विरुद्ध शाळा असं चित्र झालं, ज्याचा त्रास तिला व्हायला लागला.

बऱयाच वेळा ‘टोकाचा आदर्शवाद’ हा आपलं नुकसान करू शकतो. कारण तो अपेक्षांचं ओझं आपल्यामागे घेऊन येतो. अशा वेळी व्यक्ती इतरांकडून अपेक्षा बाळगतेच, पण त्यांची पूर्तता होण्यासाठी इतरांवर नकळत ओझंही लादत असते. साहजिकच हे ओझं इतर व्यक्ती घेत नाहीत. मग त्यामुळे ती व्यक्ती चिडचिड (मला कोणी समजून घेत नाही), दुःख (मी एकटी पडले), नैराश्य (मी हरले) या आणि अशा अनेक मनस्तापांतून जाते व मग त्याचे परिवर्तन शारीरिक व्याधींमध्ये होते. म्हणूनच मनोकायिक आजारांना आवर घालायचा असेल तर काही गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात-
1. सगळ्या गोष्टी माझ्या आवाक्यात नाहीत. उदाहरणार्थ; इतरांकडून होणारं कौतुक.
2. सगळ्याच गोष्टी मला शक्य नाहीत आणि तरीही मी उपयुक्त आहे.
3. सगळ्या गोष्टी माझ्याच मनाप्रमाणे घडू शकत नाहीत आणि हे मला मान्य आहे.
4. काही गोष्टी मला करता आल्या नाहीत तरीही काहीही बिघडत नाही.
अशा प्रकारची धारणा या व्यक्तींनी बाळगायला सुरुवात केली पाहिजे आणि त्याचबरोबर ध्यान, योग, तसेच वर्तमानात राहून आहे त्या वेळेचा विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपल्या हातात फक्त आणि फक्त वर्तमान असतो. भूतकाळ हा कधीही पुन्हा येत नाही आणि भविष्यकाळ हा कधीही हाती लागत नाही.

अर्चनाला या गोष्टी हळूहळू पटायला लागल्या होत्या आणि त्यावर ती काम करत होती. हळूहळू तिच्यामध्ये फरक पडायला लागला होता. तिच्या कमतरता तिने सकारात्मक दृष्टीने स्वीकारायला सुरुवात केली आणि स्वतच्या क्षमतांचं कौतुक इतरांवर अवलंबून न ठेवता स्वतच करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजेच अर्चनाच्या शारीरिक तक्रारी हळूहळू कमी झाल्या आणि ती पुन्हा जोमाने शाळेचं काम पाहू लागली.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)