
गणपतीसाठी गावाला निघालेल्या गणेशभक्तांना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने रडकुंडीला आणले. पनवेलपासून महाडपर्यंत ठिकठिकाणी ट्रॅफिक कोंडीत गणेशभक्त अडकत असल्याने त्यांचे कोकणात पोहोचण्याचे टाइमटेबल कोलमडले. गणेशोत्सवाआधी माणगाव बायपास सुरू करण्याच्या सरकारी डेडलाईनचे बारा वाजल्याने माणगावच्या अरुंद रस्त्यावर चार किलोमीटरच्या रांगा लागल्या. त्यामुळे पनवेल ते पोलादपूर हे अवघे दीडशे किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सात तासांचा वेळ लागल्याने गणेशभक्तांचा वाटेतच मोरया झाला आहे.
गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी इंदापूर ते माणगाव चार किमीच्या रांगा पोहोचण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासूनच चाकरमान्यांनी कोकणच्या दिशेने कूच केले आहे. मात्र एकाच वेळी एसटी बसेस, कार, खासगी बसेस रस्त्यावर आल्याने ठिकठिकाणी वाहतुकीचा जांगडगुत्ता झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी शेकडो जीवघेणे खड्डे पडल्याने चाकरमान्यांना मणक्याला दणके खातच प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे आणि अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचा फटका गणेशभक्तांना बसत आहे.
गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी असतानाही ट्रक आणि केमिकल टँकर महामार्गावर धावताना दिसत असल्यामुळे ही अवजड वाहनबंदी कागदावरच असल्याचे चित्र आहे.
मिसिंग लिंकनंतरही मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पुन्हा जाम!
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित मिसिंग लिंक १ मे २०२६ रोजी सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही अपेक्षा फोल ठरली. खालापूर टोलनाक्याजवळ पुण्याच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने एक्सप्रेसवे पुन्हा ठप्प झाला. पुण्याकडे जाणाऱ्या वाढत्या वाहनांसोबतच पालीमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या मोठ्या गर्दीने वाहतुकीचा बोजवारा उडाला. बोरघाट, पळस्पे येथील वाहतूक पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग पथके कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

























































