
पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया दहिसर ते भाईंदर सागरी मार्गाचे काम वेगाने सुरू असून 60 पिलर, 5 पाईल कॅप आणि 4 पिलरची कामे पूर्ण झाली आहेत. 2 हजार 337 कोटींच्या या प्रकल्पामुळे दहिसर ते भाईंदर हा पाऊण तासाचा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटांत होणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने मुंबई किनारा रस्ता उत्तर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा मेगा प्रकल्प आंतरबदल व जोडरस्त्यासह सुमारे 60 किलोमीटरचा असून वेसावे-भाईंदर हा किनारा जोडला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर-भाईंदर जोड रस्ता अशा सात टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील भाईंदर आंतरबदल या प्रकल्पस्थळाला भेट देऊन आढावा घेतला. प्रकल्पाबाबत आवश्यक सूचनाही दिल्या. दहिसर-भाईंदर जोड रस्ता प्रकल्पातील सुमारे 3.83 किलोमीटर लांबीचा व 45 मीटर रुंदीचा मुख्य उन्नत रस्ता हा मुंबई किनारा रस्त्याचा अंतिम भाग आहे. लवकरच लाँचिंग गर्डरचे काम सुरू करण्यात येणार आहे.
डिसेंबर 2028 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत
प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, त्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करावा. विविध प्राधिकरणांसह मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे, सुरक्षाविषयक प्रमाणित कार्यप्रणालीचे अत्यंत काळजीपूर्वक पालन करावे, कामे सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कार्यस्थळी बॅरिकेडिंग करावे, कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश बांगर यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले. ही सर्व कामे डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे.

























































