
औसा तालुक्यातील उजनी येथे 46 वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून आपल्या शेतातील कोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीमंत विभीषण वळके (वय 46 वर्षे, रा. उजनी, ता. औसा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे उजनी परिसर आणि भादा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, श्रीमंत वळके यांच्या नावावर विविध कार्यकारी सोसायटीचे 56 हजार रुपयांचे कर्ज होते. त्यातच मागील दीड महिन्यापासून पावसाने संपूर्णपणे दडी मारल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके डोळ्या देखत जळून चालली होती. पेरणी आणि फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेल्याने आणि मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज व लोकांचे उसने घेतलेले पैसे कसे परत करायचे, या मोठ्या आर्थिक विवंचनेत ते मागील महिनाभरापासून होते. याच सततच्या मानसिक तणावातून त्यांनी शनिवार, दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1:45 वाजेच्या सुमारास उजनी शिवारातील स्वतःच्या शेतातील कोठ्यात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मृत व्यक्तीचे भाऊ बळवंत विभीषण वळके यांनी भादा पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरुन भादा पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपासाची चक्रे फिरली असून, दाखल अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ) एम. एम. तांबरे यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस हवालदार बकल नंबर 285 शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.कर्जबाजारीपणा आणि निसर्गाची अवकृपा यामुळे आणखी एका बळीराजाला आपले प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.























































