Ganpati Bappa Morya 2026- उकड न काढता बनवा झटपट शाही मोदक; गणरायाच्या नैवेद्यासाठी भन्नाट पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवण्याची लगबग सुरू होते. पारंपरिक उकडीचे मोदक करण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते. त्यामुळे यंदा काहीतरी वेगळे करून पाहायचे असेल तर शाही मोदक हा सोपा आणि झटपट पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे हे मोदक तयार करण्यासाठी उकड काढण्याची गरज नाही.

शाही मोदकासाठी बारीक चिरलेले बदाम, पिस्ता आणि गुलकंद किंवा गुलाबाच्या पाकळ्यांचा जाम यांचे सारण तयार केले जाते. मोदकाच्या बाहेरील मिश्रणासाठी सुका नारळ, तूप आणि गोड कंडेन्स्ड मिल्कचा वापर करता येतो. चव वाढवण्यासाठी वेलची पावडर आणि आकर्षक रंगासाठी खाद्य रंग वापरता येतो.

सर्वप्रथम बदाम-पिस्त्यामध्ये गुलकंद मिसळून सारण तयार करावे. त्यानंतर पॅनमध्ये तूप आणि कंडेन्स्ड मिल्क घेऊन मंद आचेवर गरम करावे. त्यात सुका नारळ आणि आवश्यकतेनुसार खाद्य रंग घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळावे. गॅस बंद केल्यानंतर मिश्रण थोडे थंड झाल्यावर वेलची पावडर घालावी.

मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर मोदकाच्या साच्यात भरावे. मध्ये तयार केलेले ड्रायफ्रूटचे सारण ठेवून साचा बंद करावा. अतिरिक्त मिश्रण काढून मोदक अलगद बाहेर काढावा. कमी वेळेत तयार होणाऱ्या या शाही मोदकामुळे पारंपरिक नैवेद्याला हटके चव देता येऊ शकते.