दिल्लीच्या स्वरूप नगरमधील गोदामाला भीषण आग; धूर आणि भीतीमुळे उड्या मारल्याने सहा जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या स्वरूप नगर परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये सहाजण होरपळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची तब्बल पंधरा वाहने तैनात करण्यात आली होती आणि सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

स्वरूप नगरच्या लेन क्रमांक 2 मधील खसरा येथील इमारतीच्या तळघरात, पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ही आग लागली. ही इमारत सुमारे 200 चौरस यार्ड क्षेत्रफळात पसरलेली आहे. पोलीस उपआयुक्त (डीओ) ए. के. जयस्वाल यांनी एडीओ वाय. एस. मीना यांच्यामार्फत आग नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यात आणि गोदामात ज्युडोचे कपडे, बॉक्सिंग ग्लोव्हज बनवले जात असत तसेच तिथे रेक्झिन श्रेडिंग आणि सुती विणकामाचे काम चालत होते. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत तसेच आगीच्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती तात्काळ स्वरूप नगर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

या भीषण आगीच्या घटनेत थेट आगीमुळे कोणीही भाजून जखमी झाले नाही, मात्र शेजारच्या इमारतीमधील काही रहिवाशांमध्ये तीव्र भीती पसरली. धुरामुळे गुदमरून आणि बचावासाठी घाबरून शेजारच्या इमारतीमधील रहिवाशांनी आपल्या घरातून व इमारतीवरून खाली उड्या मारल्या, ज्यामुळे एकूण सहा जण जखमी झाले. एका व्यक्तीने जवळच्या इमारतीवरून उडी मारल्यामुळे त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी पाच जणांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात आणि एकाला बुराडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या सर्व जखमींची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.