
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेले आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावरून प्रतिक्रिया देताना चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी काल मध्यरात्री ही कारवाई केली.
गेल्या आठवड्यात चिखली मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणे वाजवण्यात आले होते. रॅलीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. या रॅलीतील गाण्याची चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी आमदार संजय गायकवाड यांची याबाबत प्रतिक्रिया घेतली. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी ‘बाप तो बाप है’ या वाक्याचा संदर्भ देत आमदार श्वेता महाले यांच्याबाबत टिप्पणी केली.
आमदार गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना, ‘बाप तो बाप है’ हे ठीक आहे. मात्र एखाद्या पुरुषाने असे म्हटले तर चालेल; एखाद्या महिलेने ‘बाप तो बाप है’ असे म्हटल्यास ‘बापासारखे शरीर आणणार कुठून?’ अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. विविध प्रसारमाध्यमांमधूनही या वक्तव्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात तसेच महिला वर्गातून नाराजी व्यक्त होऊ लागली. दरम्यान, एका महिलेने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आमदार गायकवाड यांनी महिलांच्या शरीरयष्टीवरून टिप्पणी करून महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच संबंधित वक्तव्यामुळे महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. हे वक्तव्य केवळ विनोद किंवा सहज प्रतिक्रिया नसून, हेतूपुरस्सर महिलांना डिवचणारे असल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. तक्रारीची दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत. दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, आता पोलिस तपासात पुढे काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

























































