
हिंदुस्थानात आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान परदेशी पाहुण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत स्नेहभोजनाच्या मेन्यूवरून आता नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. या स्नेहभोजनात केवळ शाकाहारी पदार्थांचा समावेश केल्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, “देशातील तब्बल ८० टक्के नागरिक हे मांसाहारी आहेत, तरीही सरकारने ब्रिक्स परिषदेसारख्या जागतिक मंचावर पाहुण्यांसाठी केवळ शाकाहारी पदार्थांचा मेन्यू का ठेवला? हिंदुस्थानची खरी ताकद आणि ओळख ही इथल्या विविधतेत दडलेली आहे, ज्यात अन्नसंस्कृतीचाही मोठा वाटा आहे.”
ते म्हणाले की, मोदी सरकार परदेशी नेत्यांसमोर हिंदुस्थानची ही खरी, बहुसांस्कृतिक आणि वैविध्यपूर्ण ओळख लपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. केवळ एका विशिष्ट विचारधारेला खतपाणी घालण्यासाठी आणि देशाची सर्वसमावेशक प्रतिमा पुसून टाकण्यासाठी हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.























































