
रेल्वेत UPIच्या माध्यमातून तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी 15 ऑक्टोबर 2026 पासून नियमांमध्ये बदल होणार आहे. नव्या UPI नियमांनुसार, 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सामान्य व्यापाऱ्यांना 0.4 टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू होणार आहे. मात्र, रेल्वे तिकीट बुकिंगसाठी स्वतंत्र श्रेणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 2,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या रेल्वे तिकिटासाठी UPIने पैसे भरताना 0.4 टक्क्यांऐवजी फक्त 5 रुपयांचा निश्चित MDR लागू होणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे हा 5 रुपयांचा शुल्क प्रवाशांकडून स्वतंत्रपणे आकारला जाणार नाही. हे शुल्क तिकीटाचे पैसे स्वीकारणाऱ्या व्यापारी किंवा संबंधित मर्चंटकडून भरला जाणार आहे.
प्रवाशांना 5 रुपये द्यावे लागणार का?
2,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेल्वे तिकीट UPIच्या माध्यमातून बुक केल्यास प्रवाशांना स्वतंत्रपणे 5 रुपये द्यावे लागणार नाहीत. हे शुल्क मर्चंट म्हणजेच पैसे स्वीकारणाऱ्या पक्षावर लागू होईल.
5 रुपयांचा MDR हा पेमेंट प्रक्रियेसाठी आकारला जाणारा शुल्क आहे. वित्त मंत्रालयाने बँकांना हा शुल्क ग्राहकांकडून स्वतंत्रपणे वसूल केला जाणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या प्रवाशाने 3,000 रुपयांचे रेल्वे तिकीट UPIने बुक केले, तर त्याला 3,000 रुपयेच द्यावे लागतील. केवळ नव्या MDR नियमामुळे तिकिटाची किंमत 3,005 रुपये होणार नाही.
त्याचप्रमाणे, 5,000 रुपयांच्या रेल्वे तिकिटासाठी सामान्य नियमाप्रमाणे 0.4 टक्के MDR लागू झाला असता तर 20 रुपये शुल्क झाले असते. मात्र, रेल्वे तिकिटांसाठी विशेष श्रेणी असल्याने मर्चंटकडून केवळ 5 रुपयांचा निश्चित MDR आकारला जाईल.
रेल्वे तिकिटाचे भाडे वाढणार का?
नव्या MDR नियमामुळे रेल्वे तिकिटाचे भाडे आपोआप वाढणार नाही. सौरभ जैन यांच्या माहितीनुसार, तिकिटाची किंमत 3,000 रुपये असेल आणि त्याचे UPIने पेमेंट केले असेल तर प्रवाशाकडून 3,005 रुपये घेता येणार नाहीत.
5 रुपयांचा अतिरिक्त MDR हा पेमेंट प्रक्रियेचा खर्च असून तो मर्चंटकडून भरला जाणार आहे. तसेच, 2,000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर नव्या MDRचा परिणाम होणार नाही.


























































