
‘वेलकम’ आणि ‘आशिकी’ यांसारख्या बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध सहाय्यक अभिनेते, कॉमेडियन मुश्ताक खान यांचे गुरुवारी कर्करोगामुळे निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. या हरहुन्नरी अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
मध्य प्रदेशातील बालाघाट जिह्यातील बैहर शहरात जन्मलेल्या मुश्ताक खान यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. 1980 मध्ये ‘थोड़ी सी बेवफाई’ आणि ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ या चित्रपटांमधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नव्वदच्या दशकात मुश्ताक खान यांनी ‘सडक’, ‘साथी’, ‘क्रांतिवीर’, ‘राजा’, ‘मेजर साब’ आणि ‘मन’ यांसारख्या चित्रपटांतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.


























































