मुंबईत 10 टक्के पाणीकपातीची टांगती तलवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>देवेंद्र भगत

निर्णयासाठी जल विभागाचा आयुक्तांकडे प्रस्ताव, राज्य सरकारलाही राखीव कोटय़ासाठी पत्र

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावांत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 20 दिवसांचा पाणीसाठा कमी असल्यामुळे प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी 10 टक्के पाणी कपातीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरूदेखील झाली आहे. याबाबत जल विभागाने प्रस्ताव तयार केला असून आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे मुंबईत कोणत्याही क्षणी 10 टक्के पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या तुटवडय़ामुळे जल विभागाने राज्य सरकारकडेही राखीव कोटय़ातील पाणी देण्यासाठी पत्र दिले आहे.

मुंबईला महानगरपालिकेकडून अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभर पाणीसाठा सुरळीत सुरू राहण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी 1447363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. या साठय़ानुसार पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास विलंब लागल्याने तलाव तळ गाठत असल्यामुळे 10 ते 20 टक्क्यांपर्यंत पाणीकपात केली जाते. गेल्या वर्षी 17 ऑक्टोबरपर्यंत मान्सून बरसत होता. मात्र या वर्षी 29 सप्टेंबर रोजी पाऊस पडणे बंद झाले. यामुळे दरवर्षी वाढीव 5 ते 7 टक्के जादा मिळणारे पाणी या वर्षी मिळाले नाही. पण 1 ऑक्टोबरपासून पाण्याचा वापर मात्र सुरू राहिला. यामुळे या वर्षी पाण्याची तूट दिसत असल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली.

पालिकेने सरकारकडे अप्पर वैतरणा धरणातून 93 हजार 500 मिलियन लिटर व भातसा धरणातून 1 लाख 37 हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठय़ाची मागणी केली आहे. सद्यस्थितीत आता सातही धरणांत 7 लाख 14 हजार 613 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

हा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका आहे. त्यात जून महिन्यापासून पावसाने हजेरी लावली नाही, तर पाणीबाणी परिस्थिती ओढवू शकते. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर मार्च महिन्यापासून 10 टक्के पाणी कपात लागू होण्याची श्aाक्यता आहे.

गेल्या तीन वर्षांत…

2023मध्येदेखील 1 जुलैपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. यानंत्aारच तलावांत समाधानकारक पाऊस झाल्यानंतर 8 ऑगस्टपासून ही पाणी कपात मागे घेण्यात आली होती. तर 2022मध्येदेखील पाणीसाठा 11 टक्क्यांपर्यंत खाली गेल्यामुळे 27 जूनपासून पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासून तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे दोन आठवडय़ांनंतर पाणी कपात मागे घेण्यात आली होती.