बांधकाम व्यावसायिकाला गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 16 लाख रुपयांची लाच घेणारे एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी रात्री रंगेहाथ पकडले. या व्यावसायिकाने बांधलेली इमारत पडल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील गंभीर कलमे हटवण्यासाठी कदम यांनी व्यावसायिकाकडे सुरुवातीला 50 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती हा सौदा 18 लाखांवर पक्का झाला होता.
बेलापूर येथील शहाबाज गावात या बांधकाम व्यावसायिकाने बांधलेली इमारत कोसळली. त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात गंभीर कलमे लावण्याची धमकी सतीश कदम यांनी बिल्डरच्या मुलाला दिली होती. जर वडिलांना वाचवायचे असेल तर 50 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र नंतर तडजोडीअंती ही रक्कम 18 लाखांवर आली. त्यानुसार बिल्डरच्या मुलाने कदम यांना गेल्या महिन्यात 14 लाख रुपये दिले. संबंधित बिल्डर सध्या तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. कदम यांनी गेल्या आठवड्यात पुन्हा या बिल्डरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
गुन्ह्यात अटक न करण्याकरिता त्यांनी बिल्डरच्या मुलाकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार या मुलाने कदम यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर उलवे येथील घराभोवती सापळा रचला. लाचेची साडेतीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना कदम यांच्यावर झडप घातली. कदम यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.