डय़ुटीवरून घरी परतताना मांजाने चिरला होता गळा; पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी खेरवाडीत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मांजाने गळा चिरल्याने पोलीस शिपाई समीर जाधव यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

समीर जाधव हे दिंडोशी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई (बीट मार्शल) म्हणून काम करत होते. रविवारी सायंकाळी ते डय़ुटी संपवून मोटरसायकलने वरळी येथील घरी जात होते. त्यांची मोटारसायकल वाकोला पुलावर आली तेव्हा अचानक मांजा आल्याने त्याचा गळा चिरला गेल्याने ते खाली पडले. हा प्रकार गस्तीवर असलेल्या खेरवाडी पोलिसांच्या लक्षात आला. खेरवाडी पोलिसांनी जाधव यांना उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना जाधव यांच्या पॅण्टच्या खिशात ओळखपत्र आढळून आले. त्यावरून जाधव यांची ओळख पटली. जाधव यांच्या मृत्यूप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पतंग उडवणाऱया दोघांवर कारवाई
जाधव यांच्या मृत्यूची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. सोमवारी सायंकाळी पश्चिम द्रुतगती महामार्गावर पतंग उडवणाऱया दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांकडे नायलॉनचा मांजा होता. पोलिसांनी तो मांजा जप्त केला. ते दोघेही खार परिसरातील नागरिक आहेत. हयगयीने आणि निष्काळजीपणाने स्वतःच्या व इतरांच्या जिवास धोका उत्पन्न होईल म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.