
घाटकोपर पश्चिमेकडील एका सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी 5 जणांची टोळी आली होती. प्रत्येकाने त्यांच्या प्लॅनिंगनुसार जागा घेतली होती, पण तेवढय़ात घाटकोपर पोलिसांचे पथक गस्त करत तेथे धडकले आणि चोरांचा डाव उधळला गेला. संशयास्पद हालचाल करणाऱया त्या चोरांकडे बघितल्यानंतर पोलिसांनी तिघांना उचलले, तर अंधाराचा फायदा घेत दोघांनी पळ काढला.
घाटकोपर पश्चिमेकडील एम. जी. मार्गावर मोनालिसा नावाचे सराफाचे दुकान आहे. शनिवारी रात्री उशिरा गुन्हे प्रकटीकरण अधिकारी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे तसेच विद्याधर कोयंडे, संदीप देवार्डे, महेंद्र पंक, नितीन बोराडे व संतोष नागरे हे पथक रात्री 3 वाजण्याच्या सुमारास गस्त घालत त्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी मोनालिसा दुकानाबाहेर दोन तरुण संशयास्पदरीत्या टेहळताना दिसून आले. दोघांनी टोपी घातली होती तसेच तोंडावर मास्क लावला होता, तर त्यांचे अन्य तिघे साथीदार त्या ठिकाणी असलेल्या ऑक्सिस बँकेसमोर गाडीमध्ये बसून लक्ष ठेवत होते. खरमाटे व त्यांच्या पथकाने लगेच गाडीत बसलेल्या तिघांना उचलले, पण अंधाराचा फायदा घेत दुकानाबाहेर घुटमळणाऱया दोघांनी तेथून पळ काढला. राजेश कदम (38), महावीर कुमावत (36) आणि हापुराम राजपुरोहित (22) अशी त्या तिघांची नावे आहेत. पकडलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ घातक शस्त्र, दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य असे मिळून आले. राजेशविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत 24 गंभीर गुह्यांची नोंद आहे, तर महावीरविरोधात विविध पोलीस ठाण्यांत 14 गुह्यांची नोंद आहे.


























































