
सामना ऑनलाईन, पोलादपूर
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत सहाय्यक असलेल्या कर्मचाऱ्याने चक्क 108 रुग्णवाहिकेवर डॉक्टर म्हणून काम केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे या ‘मुन्नाभाई’ने वरिष्ठांच्या आशीर्वादाने पत्नी व मेहुणीला प्राथमिक आरोग्य केंद्रातील महालॅबच्या खासगी कंत्राटामध्ये नोकरी लावली आहे. प्रशासनाचा हा भोंगळ कारभार रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अपघात असो वा गर्भवती महिला तसेच आपत्कालीन सेवा 108 ही रुग्णवाहिका ग्रामीण भागातील जनतेसाठी महत्त्वाचा दुवा ठरली आहे. मात्र आरोग्य खात्यातील बेफिकीर अधिकाऱ्यांमुळे ही सेवा आता सर्वसामान्य रुग्णांसाठी कर्दनकाळ ठरण्याची शक्यता आहे. बीक्हीजीच्या या सेवेत पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात लॅब असिस्टंट असलेला सुभाष भोसले हा एकीकडे सरकारी पगार घेत असताना 108 या रुग्णवाहिकेवर बिनबोभाट डॉक्टर म्हणून काम करत असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या आशीर्वादाने पत्नी व मेहुणीलाही त्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महालॅबच्या खासगी कंत्राटामध्ये नोकरी लावून दिली आहे. या महिलांनी सीएमएलटी, डीएमएलटी अथवा बीएससी एमएलटी एमडी पॅथ आदी पॅरामेडिकल क्षेत्रातील कोणतेही शिक्षण घेतले नसल्याचे उघड झाले आहे.
शैक्षणिक पात्रतेची ‘ऐसी की तैसी’
नोकरीला लागताना सुभाषने बारावी सायन्स पास झाल्याची कागदपत्रे सादर केली आहेत. त्याचवेळी 108 रुग्णवाहिकेवर काम करताना मात्र डॉक्टर असल्याचे प्रमाणपत्र जोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

























































