घर शोधणे अखेरचे ठरले…; लोकल अपघातात पोलिसाचा मृत्यू

लोकलच्या अपघातात मुंबई पोलीस दलाच्या एलएमधील पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. रवींद्र हाके असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. रवींद्र हा नवीन खोलीच्या शोधात जात असताना ही घटना घडली. पाच दिवसांपूर्वी रवींद्रच्या पत्नीने मुलाला जन्म दिला होता. गावावरून कुटुंबियांना घेऊन तो मुंबईत राहणार होता.

रवींद्र हा इंदापूरच्या मदनवाडी येथील रहिवासी. तो मुंबई पोलीस दलाच्या एलए (ताडदेव) येथे ड्युटीला होता. रवींद्रचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. पाच दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला होता. पत्नी आणि मुलाला घेऊन रवींद्र हा मुंबईत राहण्यासाठी घर शोधत होता. शुक्रवारी तो त्याच्या मित्रांसोबत घर शोधण्यासाठी गेला होता. विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान म्हाडाच्या इमारतीत तो घर पाहून आला होता.

रवींद्र हा शनिवारी नाईट शिफ्ट करून आज सकाळी साडेअकरा वाजता विक्रोळी स्थानकात आला. आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असल्याने कामासाठी वॅगन व्हॅन आणली होती. रवींद्रला कांजूरमार्ग आणि विक्रोळीदरम्यान असलेल्या परिसरात जायचे होते. त्यासाठी तो रेल्वे रुळाजवळून जात असताना त्याला वॅगन व्हॅनची धडक बसली. त्यात रवींद्र हा गंभीर जखमी झाला. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याची माहिती समजताच कुर्ला रेल्वे पोलीस घटनास्थळी आले. रवींद्रकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.