सांगलीत एक थरारक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पलूस येथे विठ्ठलवाडी रेल्वेगेटवर मोठा अनर्थ टळला आहे. भरधाव स्कूलबस रेल्वेचे गेट तोडून थेट रुळावर जाऊन अडकली. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मात्र दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला.
काय घडलं नेमकं?
मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास आमणापूर-विठ्ठलवाडी रेल्वे गेटवर गेट लावत असतानाच एक भरधाव स्कूल बस गेटला जोरात आदळून थेट रेल्वे रुळावर जाऊन अडकली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. याच दरम्यान या रुळावरुन जाणारी डेमो काही अंतरावर दाखल झाली. मात्र गेटमन आणि नागरिकांनी ही डेमो तात्काळ थांबवली. यानंतर दुसऱ्या ट्रॅकवरुन रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली.
स्कूलबस थेट रेल्वेरुळावर अडकली, समोरुन रेल्वे आली; सांगलीत घडली थरारक घटना#Sangli pic.twitter.com/TYDHOhx6pr
— Saamana (@SaamanaOnline) August 13, 2024
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत रुळावर अडकलेली बस बाजूला हटवली आणि रेल्वेमार्ग मोकळा केला. मात्र या घटनेमुळे आमणापूर-विठ्ठलवाडी रेल्वेमार्ग एक तास ठप्प झाला होता. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली होती.