खोके सरकारची दडपशाही दुर्दैवी! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारसू येथे सुरू असणारी खोके सरकारची दडपशाही अतिशय दुर्दैवी असून तेथील ग्रामस्थांवर पोलिसांकरवी होत असलेला अत्याचार आधी थांबवा, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. बारसूमध्ये ग्रामस्थ टाहो फोडत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र गायब आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘निसर्गसंपन्न कोकण जपणाऱ्या भूमिपुत्रांवर हे रावणराज्य चालवणारे सरकार पोलिसांकडून वार करण्यासही मागेपुढे पाहणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे… पहिल्यांदा हा अत्याचार थांबवा! शासकीय सर्व्हे थांबवा! स्थानिकांशी संवाद साधा! फायदा कुणाचा होणार आहे हे सांगा!’ असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

वाद वाढवण्यापेक्षा जाहीर संवाद साधा!

वाद वाढविण्यापेक्षा बारसूतील ग्रामस्थांशी जाहीर संवाद साधा असे मतही आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे.  ‘प्रकल्प काय आहे हे जनतेला समजावून सांगावं अशी महाविकास आघाडी सरकारची भूमिका होती. तसे एक जाहीर प्रेझेंटेशन द्यावे, पारदर्शकता ठेवावी आणि अंतिम मान्यता ही भूमिपुत्रांची असावी!’ असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.