
जोगेश्वरी रेल्वे स्थानकाबाहेर सरकत्या जिन्यासह उभारण्यात आलेला पादचारी पूल, इस्माईल युसूफ महाविद्यालयात उभारण्यात आलेले फायरिंग रेंज तसेच ऑबस्ट्रेकल ट्रॅकचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. पुलामुळे अपघाताला आळा बसणार असून स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या सौंदर्यात भर घालणारे तसेच इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या संरक्षण भिंतीवर काढण्यात आलेल्या भव्यदिव्य असे भित्तिचित्राचेही लोकार्पण आदित्य ठाकरे यांनी केले. आदित्य ठाकरे म्हणाले, महाविद्यालयाच्या संरक्षण भिंतीवर काढण्यात आलेली ही भित्तिचित्रे मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या मार्गावरून प्रवास करताना भिंतीकडे लक्ष जातेच. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांना नेमके काय हवे आहे याची माहिती मिळते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुन्हा महाविद्यालयात येणार असून महाविद्यालयात महिला वसतिगृह, ग्रंथालय, विज्ञान इमारतीसाठी शक्य तेवढा निधी जिल्हा नियोजनमधून देऊ, असे आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी आमदार रवींद्र वायकर, विभागप्रमुख- आमदार सुनील प्रभू, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू, पालिका उपायुक्त उल्हास महाले, मनपा उपायुक्त, परिमंडळ-3 विजय बालमवार, मनपा प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, विभाग संघटक साधना माने, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, शालिनी सावंत, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, माजी नगरसेवक बाळा नर, प्रवीण शिंदे, इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वामी वाव्हळ, कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, उपविभागीय अभियंता नितीन पगारे, संदेश लोणारे, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक आदी उपस्थित होते.
z जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील ट्रक क्रमांक 6 (पूर्वीचा 4 नंबर) वरील रेल्वे फाटक क्रॉस करताना अनेकांचे बळी जायचे. त्यामुळे हा भाग मृत्यूचा सापळा बनला होता. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात यावा अशी मागणी सामान्यांकडून होत होती. आमदार वायकर यांनी हा पादचारी पूल उभारण्यासाठी महापालिकेकडून 2 कोटी 57 लाख रुपये मंजूर करून त्याचे काम पूर्ण केले. वायकर यांच्या संकल्पनेतून सरकत्या जिन्यासहित आकर्षक असा हा पादचारी पूल उभारण्यात आला आहे.
z पुलाचे काम पूर्ण झाले असून सामान्य आणि प्रवाशांना थेट रेल्वे स्थानकावरून या पुलावरून सरकत्या जिन्याने इस्माईल युसूफच्या प्रवेशद्वाराजवळ उतरणे शक्य होणार आहे.
z पुलामुळे रेल्वे फाटक ओलांडण्यापासून प्रवाशांची व स्थानिक नागरिकांची सुटका झाली असून येथील जीवघेण्या अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे.
z वरळी येथील पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या फायरिंग रेंजच्या धर्तीवर इस्माईल युसूफ महाविद्यालयात सर्व सुविधांनी युक्त अशी राष्ट्रीय छात्र सेना नेमबाजी प्रशिक्षण केंद्र व ऑबस्ट्रेकल ट्रक (अडथळा प्रशिक्षण केंद्र) उभारण्यात आले आहे.



























































