
संपूर्ण जग वातावरणीय बदलाच्या परिणामांशी लढा देत आहे. प्रत्येक नागरिकाने शासन, प्रशासन, सामाजिक संस्था यांच्यासोबत काम केले पाहिजे. स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन लहान लहान पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्यास वातावरणीय बदल नक्कीच रोखता येतील. हे बदल रोखण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने आणि अध्यक्षतेखाली संपर्क आणि स्त्री आधार केंद्रामार्फत आयोजित हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे याबाबत जागृती निर्माण करणाऱया ‘मंथन’ या ऑनलाइन परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, संपर्क आणि स्त्री आधार केंद्राचे विश्वस्त आणि सदस्य उपस्थित होते. राजकारण हे तळागाळापर्यंत पोहोचणारे आणि कामाच्या माध्यमातून समाधान देणारे क्षेत्र आहे. या माध्यमातून विधिमंडळ सभागृहातील चर्चेपासून गावपातळीपर्यंत वातावरणीय बदलाबाबत मंथन होऊ लागले आहे, ही अत्यावश्यक आणि सकारात्मक बाब आहे. वातावरणीय बदल स्वीकारून ते रोखण्यासाठी उपाययोजना करताना लोकसहभाग अतिशय गरजेचा आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविताना याचा अनुभव येत असून गावपातळीपर्यंत प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखून काम करीत असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्य सरकारने युनिसेफसोबत शालेय अभ्यासक्रमासाठी तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत वातावरणीय बदलाबाबत काम करण्यासाठी करार केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जग, हिंदुस्थान आणि महाराष्ट्र
दुसऱ्या सत्रात दिल्ली येथील परवी संस्थेचे अजय झा यांनी ‘जग, हिंदुस्थान आणि महाराष्ट्रः हवामान बदल आणि शाश्वस्त विकास उद्दिष्टे यांची सांगड’ याबाबत वृत्त मांडणी केली. ‘महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात हवामान बदल आणि शाश्वत विकास उद्दिष्टे यावरील कामाची गरज’ याबाबत अमितव मलिक, प्रशांत गिरबाने यांनी मत व्यक्त केले. त्याचबरोबर ‘शाश्वत विकासाची उद्दिष्टे, ऊर्जा आणि हवेची गुणवत्ता’ यावर प्रियदर्शिनी कर्वे, शिरीष फडतरे तर ‘जमीन, पोषण आणि शेती’ दिलीप गोडे, त्याचबरोबर ‘पाणी’ या विषयावर अभिजित घोरपडे, आरोग्य व डॉ. संदीप साळवी, शिक्षणासंदर्भात संस्कृती मेनन, ‘नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती’ या विषयावर अरुण शिवकर तर ‘महिला आणि हवामान बदल’ यासंदर्भात स्त्री आधार संस्थेच्या अपर्णा पाठक आणि विभावरी कांबळे यांनी मांडणी केली. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन संपर्कच्या मेधा कुळकर्णी यांनी केले.
वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे काम कौतुकास्पद
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले, महाराष्ट्र हे अनेक क्षेत्रांत देशात आघाडीवरचे राज्य आहे. ज्या क्षेत्रात अजूनही आपल्याला चांगले काम करायचे आहे, त्याबाबत राज्याने नीती आयोगासारख्या केंद्रीय संस्थांसमोर आपले काम दाखवून देण्याची आवश्यकता आहे. वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होत असलेले काम कौतुकास्पद आहे. यात सखोल काम होण्याच्या दृष्टीने पाणी, हवा, शेती, घन कचरा अशा विविध क्षेत्रांतील समस्या आणि उपाययोजना जाणून घेण्यासाठी आयोजित ‘मंथन’ परिषदेत तज्ञांसोबत चर्चा केली जाणार आहे. वातावरणीय बदलांबाबत विधिमंडळ सभागृहाबरोबरच गावपातळीवरही मंथन होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.


























































