
ज्या शिवसेनेने या गद्दारांना सर्व काही दिलं. त्यांचा राजकीय जन्म दिला. त्यांना पदं दिली. मोठं केलं. त्या गद्दारांनाच त्यांच्या राक्षसी महत्त्वकांक्षासाठी शिवसेनेला संपवायचं आहे, अशी टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे आज हे त्यांच्या वरळी मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी तेथील नागरिकांच्या भेटी घेतल्या.
”जे काही झालं ते अपेक्षित नव्हतं पण आता ते झालेलं आहे. त्यामुळे आता लढायचं आणि जिंकायचं आता याच्यावरच आम्ही पुढे चाललेलो आहे. आपल्या राज्यात जे काही चाललं आहे ते घटनाबाह्य आहे. जे सरकार आपल्या डोक्यावर बसवलं आहे ते घटनाबाह्य आहे. असंच जर आपल्या देशात चाललं तर ते संविधानासाठी धोकादायक आहे. आपण बघताय की गद्दारांचा जो गट आहे तो निर्लज्जपणे अगदी खालच्या पातळीवर राजकारण नेत आहे. एवढं घाणेरडं राजकारण कधीच महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. एवढा निर्लज्जपणा कुणीच पाहिला नव्हता. त्यांना शिवसेना संपविण्यात आसूरी आनंद मिळतोय. पण तो आनंद त्यांना कधीच मिळणार नाही. महाराष्ट्रातील व देशातील जनता शिवसेनेसोबत, ठाकरे कुटुंबासोबत आहे. खोके सरकारने स्वत:ला विकलंय. स्वत:ला विकल्यानंतर आता स्वत:च्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी शिवसेनेला संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे काही नेत्यांच्या वक्तव्यांतून हे कळतंय. परवा कुणीतरी म्हणालं की अडीच वर्षापासून हे सर्व सुरू आहे. ज्या चाळीस गद्दारांना शिवसेनेने सर्व काही दिलं. त्यांना स्वत:च्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी शिवसेनेला संपवायचंय हेच दुख आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. ”आम्ही रस्त्यावर आहोत. लोकं आमच्यासोबत आहेत. असं घाणेरडं राजकारण कुणालाच आवडत नाही. वार करायचे असतील तर समोरून करा. यांची स्वत:ची ओळख नाही. माझ्या आजोबांचं नाव, आमच्या पक्षाचं नाव घेऊन सर्व करत आहेत. हिंमत असेल तर स्वत:च नाव लावा. हिंमत असेल तर सर्वांनी राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे जा.” असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.






























































