आफताबने तीन महिने फ्रीजमध्ये ठेवले होते श्रद्धाचे मुंडके

श्रद्धा वालकर हत्याकांडाचा उलगडा होऊन तीन महिने होत आले तरी दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. मंगळवारी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला असून आफताबने श्रद्धाचे मुंडके तब्बल तीन महिने त्याच्या फ्रिजमध्ये ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्या घरात ठेवलेली तिची हाडं नष्ट करण्यासाठी त्याची चक्क मिक्सरमध्ये पावडर केली.

मूळची वसईची असलेली श्रद्धा वालकर ही दिल्ली येथे तिचा बॉयफ्रेंड आफताब पुनावाला याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. आफताबने 22 मे रोजी तिची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे असंख्य तुकडे केले आणि त्यानंतर निर्दयी नराधमाने त्या शरीराच्या तुकडय़ांची विल्हेवाट लावली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.  या प्रकरणाचा तपास सुरू करून दिल्ली पोलिसांनी  12 नोव्हेंबर 2022 ला आफताबच्या मुसक्या आवळल्या होत्या.